विज्ञान-तंत्रज्ञान मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही   

व्हाइस अ‍ॅडमिरल आरती सरीन यांचे मत 

पुणे : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती आणली आहे. मात्र, ते रूग्ण बरे करण्यातील मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही, असे मत लष्करी वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक व्हाइस अ‍ॅडमिरल आरती सरीन यांनी मांडले. 
 
लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) ५९ च्या दीक्षांत संचलन कार्यक्रमात सरीन बोलत होत्या. सरीन यांनी संचलनाची पाहणी केली. उत्तीर्ण होणार्‍या १४५ छात्रांमध्ये पाच परदेशी छात्रांचा समावेश होता. या तुकडीतील सशस्त्र दलांत दाखल होणार्‍या १२१ छात्रांपैकी ९५ लष्करात, ११ नौदलात, १५ हवाई दलात दाखल होती. 
 
सरीन म्हणाल्या, लष्करी वैद्यकीय सवेला मोठा इतिहास आहे. देशातील १.२ कोटी जवान, त्यांचे कुटुंबीय आणि सेवानिवृत्तांना सेवा देण्यात येते. वैद्यकीय सेवा देताना स्वत:ची तंदुरूस्ती राखणेही महत्वाचे आहे. सन्मान, प्रामाणिकपणा आणि नि:स्वार्थ सेवेची मूल्ये जपली पाहिजेत. नेतृत्व करतानाच नम्रपणे सेवा देणे आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे, वैद्यकीय सेवांचे मूल्य आणि तत्वज्ञान यांचे जतन करणे महत्वाचे आहे. तसेच, राष्ष्ट्र प्रथम हे तत्व सदैव लक्षात ठेवले पाहिजे. 
 
प्लाइंग ऑफिसर पोयला घोष या छात्राचे आई-वडील एएफएमसीचे माजी विद्यार्थी आहेत. वडील कर्नल अरिजित कुमार नागपूर एम्समध्ये ह्दयरोग विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर आई कर्नल प्रतिभा मिश्रा दिल्लीतील लष्करी रूग्णालयात कार्यरत आहेत. त्याशिवाय तिचे आजोबाही लष्करी सेवेत होते. लहानपणापासूनच सैन्य दलातील जीवन पाहिले आहे. त्यामुळे सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टिने तयारी केली होती, असे पोयलने सांगितले.
 

Related Articles